नागपूर (वृत्तसंस्था) सीबीआयच्या उपमहानिरीक्षकांचा स्वीय साहाय्यक असल्याची बतावणी करून एका रेल्वे अधिकाऱ्याला २० लाखांची लाच मागणाऱ्या आरोपीला सीबीआयच्या पथकाने गुरुवारी अटक केली. सादिक कुरेशी, असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सादिक हा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन स्वतःला सीबीआयच्या नागपूर युनिटच्या उपमहानिरीक्षकांचा स्वीय साहाय्यक असल्याची बतावणी करीत होता. त्याने मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता संदीपकुमार वर्मा यांच्या विरोधात तक्रारी असल्याचा खोटा दावा केला. तसेच कारवाईपासून वाचविण्यासाठी त्यांना २० लाख रुपये मागितले.
पैसे दिले तर तक्रारीचा निपटारा होईल, असे आश्वासन दिले. आपण कुठलेच चुकीचे काम केले नसताना तक्रार कशी या विचारातून संदीपकुमार वर्मा यांनी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. सीबीआयच्या नागपूर कार्यालयात अशा नावाचा कुठलाही व्यक्ती नसल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. आरोपीला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले.