मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करण्याची वारंवार मागणी केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी ही राष्ट्रीय आपत्तीच आहे, असं म्हटलं आहे. आजची परिस्थिती ही राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.
‘कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातत्याने केंद्राकडे करत आहेत. मग ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये असेल किंवा पत्राद्वारे. हे राष्ट्रीय संकट आहे हे जगानंही मान्य केलं आहे. आज सर्वोच्च न्यायालयानेही कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही कोर्टाचे आभारी आहोत. कोरोनाच्या संकटामुळे सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्ट अॅक्टिव्ह झालं आहे. कोरोना कोर्टापर्यंतही पोहोचला आहे. मला वाटत त्यांच्या घरापर्यंत कोरोना गेला आहे. कोर्ट झालंय, त्यामुळे देशाला नक्कीच काही ना काही फायदा होईल,’ अशी माहिती राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र मॉडेलच तारेल
कोरोनाचं संकट वाढत आहे. देशातील जनता दहशतीत आहे. काय होत आहे हे लोकांना माहीत नाही. लोकांना मार्गदर्शन केलं जात नाही. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र मॉडेलनेच काम करावं लागणार आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं खूप काम करण्यात आलं. पण कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे. त्याची दखल आज ना उद्या कोर्ट घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.