मुंबई (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं निरिक्षण जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे.
‘राणा दाम्पत्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ नुसार राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही,’ असं निरीक्षण कोर्टाने जामीन आदेशात नोंदवलं आहे. तसंच मुंबई पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना नोटीस बजावल्यानंतर ते दोघेही खार येथील निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते, तसंच त्यांनी आपलं आंदोलनही मागे घेतलं होतं. त्यानंतरही त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं सांगत कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
‘अर्जदारांनी (राणा दाम्पत्य) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेली वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह होती. राज्यघटनेप्रमाणे असलेल्या भाषा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मर्यादा अर्जदारांनी ओलांडली यात वाद नाही. मात्र, त्यांची वक्तव्ये ही कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याच्या किंवा सरकारविरोधात चिथावणी देऊन हिंसा घडवण्याच्या उद्देशाने होती, असे दिसत नाही. कलम १२४-अ हे राजद्रोहाचे कलम लावण्यासाठी सरकारविरोधात हिंसा होण्याकरिता हेतूपूर्वक चिथावणी देणे किंवा हेतूपूर्वक कायदा-सुव्यवस्था बिघडवणे असे विधान अथवा कृत्य आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणात राजद्रोहचा गुन्हा घडल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही’, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या १७ पानी निकालात नोंदवले.
















