जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृतमहोत्सवातंर्गत देशात विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून यानिमित्ताने आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात दूरदृश्य प्रणालीमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास खासदार उन्मेष पाटील, आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त डॉ विद्या गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी राहील पाटील, आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले, भारताच्या सामर्थ्यापुढे कोणतेही लक्ष अवघड नाही. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून देशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी भारताने दीडशेपेक्षा जास्त देशांना औषधी, लसचा पुरवठा केला. प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लडाख, बिहार, त्रिपूरा, कर्नाटक, गुजरात व हिमाचल प्रदेशातील केंद्रीय योजनेचा लाभ मिळालेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशनi (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, एक राष्ट्र- एक रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर,म्हणाले प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी दूरदृष्यप्रणालीवरुन बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, योजना केंद्राच्या असो किंवा राज्यांच्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचविण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या आहेत. तसेच यापुढेही अधिकाधिक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी आमदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्येक लाभार्थीशी संवाद साधून त्यांना योजनांचा लाभ कसा मिळाला, तसेच लाभार्थ्यांच्या काही अडीअडचणी आहेत का ते जाणून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच नागपुर या जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजना व इतर केंद्रीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.