मुंबई (वृत्तसंस्था) सगळं घडवणारे हे फडणवीस आहेत. कधी काय करतील कळत नाही. सगळी फिल्डिंग लावून राज्यसभेचे उमेदवार पडले. काँग्रेसने ४४ मतं घेतली, राष्ट्रवादीने ४३ घेतली. आमचा उमेदवार येईल असं वाटत होतं, पण साला आमचा उमेदवारच पडला’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हात जोडत, सगळं उघड करु नका असं म्हटलं. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. इतकंच नाहीतर यावेळी ‘साला’ या शब्दावरुन सभागृहात जोरदार हशा झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो शब्द मागे घेतला.
संतोष बांगर मला बोलायला घाबरत होता
संतोष बांगर मला बोलायला घाबरत होता.. पण त्याने रात्री दीड वाजता फोन केला.. मला यायचंय सांगितलं.. आणखी तीन ते चार लोक आहेत आणि त्यांचं मत असंच असल्याचं ते म्हणाले. आईची तब्येत खराब असल्याचं सांगून नितीन देशमुखला विमानाने पाठवलं. सुरुवातीला २० लोक होते, नंतर मर्जीने ४० झाले.
निधी वाटपाची एक चिठ्ठी आणि शिंदे म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदन प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी बोलताना शिंदेंनी शिवसेना, राष्ट्रवादी, अजितदादा पवार आणि एकंदरीत सर्वच सत्ता नाट्यावर जोरदार टोलेबाजी केली. यावेळी निधी वाटपाची एक चिठ्ठी एकनाथ शिंदेंना मिळली. ती चिठ्ठी फेकत हा विषय संपला असं शिंदे म्हणाले. यावरूनही सभागृहात सगळे जोरदार हसले. खरंतर, अनेक दिवसांची खदखद आज मुख्यमंत्री बोलून दाखवत आहेत.
आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू…
आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पुढची निवडणूक कशी जिंकू या चिंतेत सगळे होते. आमदार नेहमी म्हणायचे भाजप आपला नैसर्गिक मित्र आहे. आपण हे काय करतोय असं आमदार म्हणायचे. उद्धव साहेबांशी बोला अशी आमदारांची मागणी होती. मी पाच वेळा हा प्रयत्न केला.. केसरकर याचे साक्षीदार आहेत. पण आम्हाला यश मिळालं नाही. दुसरीकडे दाऊदशी संबंधित व्यक्तीवर कारवाई करु शकलो नाही, संभाजीनगर नामकरण करु शकलो नाही, नंतर निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे. आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू.. कधीच विचारांशी तडजोड होणार नाही.