साळवा ता. धरणगाव (दीपक भोई) येथील भादू मळा भागातील एक बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी घरातील तिजोरी बाहेर नेत फोडली.
भादू मळा भागात भानुदास लक्ष्मण ढाके यांचे घर आहे. मागील काही दिवसापासून ते कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत. अज्ञात चोरट्यांनी हीच संधी साधत मागच्या बाजूने घर फोडत आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील तिजोरी मागच्या बाजूने घराबाहेर नेत फोडली. पण तिजोरीत पैसे नसल्यामुळे चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. परंतू घरातील कपाटात असलेली ५ हजाराची रोकड मात्र, चोरट्यांनी लंपास केल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सपोनि श्री. पाटील, सहा. फौ. करीम सैय्यद यांच्यासह भेट दिली. यावेळी पोलीस पाटील निसार पटेल, सरपंच मोरेश्वर बोरोले, उपसरपंच सतीश पवार यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, तिजोरी मोठ्या वजनाची असल्यामुळे हे काम एकापेक्षा अधिक चोरट्यांचे असल्याचे बोलले जात आहे.
















