नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने दोन कोटींचा आकडा पार केला आहे. या कोरोना परिस्थितीवरून विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका होत आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. देशाला पीएम आवास नव्हे, श्वास पाहिजे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. कोरोनाची दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. कोरोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे. ‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.
लोकांचे जीव जातायत, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली सुरूच
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधीपंतप्रधान मोदी आणि केंद्रावर वारंवार टीका करत आहेत. केंद्र सरकारची धोरणे, कोरोना परिस्थिती, लॉकडाऊन, लसीकरण यांसारख्या अनेक मुद्द्यांवरून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेसशासित राज्यांनी कोरोना लसींवर आकारल्या जाणाऱ्या जीएसटीवर आक्षेप नोंदवला होता. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.