नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित केले. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. २६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दु:खी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी पहिल्यांदाच शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसेवर भाष्य केलं आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लस आदीवरही कटाक्ष टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावर भाष्य केलं. २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. त्यानंतर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शानदार परेडही पाहिली. या महिन्यात क्रिकेट जगातूनही चांगली बातमी आली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकली. आपल्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील घटनेकडेही देशावासियांचं लक्ष वेधलं. याच दरम्यान दिल्लीत २६ जानेवारीच्या दिवशी तिरंग्याचा अपमान पाहिला. त्यामुळे देश दुखी झाला. आपल्याला येणारा काळ आशा आणि नाविन्याने ओतप्रोत भरायचा आहे. गेल्यावर्षी आपण संयम आणि साहस दाखवलेलं आहे. त्यामुळे या वर्षी मेहनत करून आपले सर्व संकल्प पूर्ण करायचे आहेत, असं त्यांनी सांगितलं. मोदींनी मन की बातमध्ये लसीकरणावरही भाष्य केलं. मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. तसेच आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे, असंही ते म्हणाले. गेल्या १५ दिवसात देशात ३० लाख कोविड योद्ध्यांना लस टोचली आहे. अमेरिकेला याच कामासाठी १८ तर ब्रिटन सारख्या समृद्ध देशाला ३६ दिवस लागले, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.
यावेळी मोदींनी मध्यप्रदेशातील झांशीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत असल्याचं सांगितलं. गुरलीन चावला यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून आधी आपल्या घरी आणि नंतर शेतात स्ट्रॉबेरीची शेती केल्याचं ते म्हणाले. तर हैदराबादमध्ये एका भाजी मंडईने भाज्या फेकून न देता त्यापासून वीज निर्माण करण्याचा संकल्प केल्याचंही त्यांनी सांगितलं.
स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव
हे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले.