नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील टोलनाक्यासंदर्भात मोठी घोषणा केली. येत्या २ वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त केला जाणार असल्याचं केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
रशियन सरकारच्या मदतीने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं असून, ही यंत्रणा लागू होताच भारत २ वर्षांत टोलमुक्त होणार आहे, असंही गडकरींनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून fastag चा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एनएचएआयच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण टोल संकलनात fastag चे योगदान मोठे आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही जीपीएस प्रणाली वापरली जाणार आहे. जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसंच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केलं आहे याचं मोजमाप करन आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल. सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचं किंवा थांबवण्याचं प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. नितीन गडकरी यांनी चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती असंही त्यांनी सांगितलं.