नागपूर (वृत्तसंस्था) देशाचे पंतप्रधान सध्या भांडवलदारांचे गुलाम झाले असून मूठभर श्रीमंतांच्या फायद्यासाठीच काम करत आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते नागपुरात बोलत होते.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले असून, न्यायालयाकडून यासाठी चार सदस्यीय समिती देखील गठीत करण्यात आलेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने नागपूर येथे राजभवनला घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “आपले पंतप्रधान भांडवलदारांचे गुलाम झालेले आहेत व ते आता शेतकऱ्यांना गुलाम बनवायला निघाले आहेत. परंतु आपण त्यांचे गुलाम होणार नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क कायम ठेवणार आहोत व हे कायदे नष्ट करण्यास सरकारला भाग पाडणार आहोत.” असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटलं. “राज्य सरकार म्हणून आमची एक समिती गठीत झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. एक- दोन बैठका देखील झाल्या आहेत. आम्ही त्यावर अभ्यास करत आहोत. आमचा जो प्रस्ताव असेल, कायदा असेल तो शेतकऱ्यांच्या बाजूचा असेल. आम्ही शेतकऱ्यांसाठी अगोदर काम करतो व नंतर बोलतो.” असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.
नव्या कृषी कायद्यांसाठी राज्यपातळीवर समिती
केंद्र लागू करु पाहत असलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आल्याचंही थोरात यांनी यावेळी सांगितलं. या समितीकडून शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
















