पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सारवे गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील पारोळ्याच्या माजी नगरसेवकाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी १०.३० वाजेसुमारास घडली.
पारोळा येथील महेश उत्तमराव चौधरी (वय ४७) हे पारोळा येथून आपल्या बुलेट (एमएच – १९, सीएच- १३११) ने एरंडोल येथील प्रांत कार्यालयात कामानिमित्त जात होते. या वेळी तालुक्यातील सार्वे गावाजवळील जिओ कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर धुळयाकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेश चौधरी यांच्या बुलेटला मागवून धडक दिली. यात महेश चौधरी यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांना एरंडोल येथील सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत पारोळा पोलिसांत अंकित महेश चौधरी यांच्या माहितीवरुन अज्ञात वाहन व अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास इक्बाल शेख करत आहेत. दरम्यान, दुर्दैवी अपघातात नगरसेवक महेश चौधरी यांचा मृत्यू झाल्याने पारोळा शहरासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.