यवतमाळ (वृत्तसंस्था) वटपौर्णिमेच्या दिवशी पतीला दीर्घायुष्य लाभो व हाच पती जन्मोजन्मी मिळो, यासाठी उपवास ठेवून महिला प्रार्थना करतात. परंतु त्याच दिवशी एका विवाहितेच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भरधाव वाहनाने धडकेत संतोष सीताराम गजभार (३०, रा. काकडदाती, पुसद) या तरुणाचा मृत्यू झालाय.
पुसद तालुक्यातील काकडदाती येथील संतोष गजभार हा एका सर्व्हिस सेंटरवर काम करत होता. शनिवारी वटपौर्णिमेच्या दिवशी दुपारी संतोष हे फराळासाठी आपल्या (एमएच २९- एएफ ०४३२) क्रमांकाच्या वाहनाने काकडदाती गावाकडे निघाले होते. याचवेळी विनोद दिना चव्हाण (३५, रा. लोहरा, ता. पुसद) याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून गजभार यांना धडक दिली. या धडकेत संतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर जखमी झालेल्या संतोषला येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृतकाची पत्नी मीरा संतोष गजभार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याचा तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संतोष याचे शव उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले होते. संतोष याला एक सात वर्षाची तर एक पाच वर्षांची मुलगी असून घरी आई वडील व पत्नी असा परिवार आहे. घरातील प्रमुख कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.