कोल्हापूर (वृत्तसंस्था) रक्षाबंधना दिवशीच लहानग्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तिटवेता (ता. राधानगरी) येथे घडली. आरोहण संदीप घारे ( वय २ ) असे या बालकाचे नाव आहे. त्याच्या आकस्मित मृत्यूमुळे दोघं बहिनींनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
घारे कुटूंबात ‘आरोही’ व ‘ओवी’ या दोन कन्येंच्या पाठीवर दोन वर्षापूर्वी ‘आरोहन’ या चिमुकल्याचा जन्म झाला. अचानकच ‘आरोहन’ला शारीरिक त्रास सुरु झाला. एका बालरोगतज्ञाला निदान केले की, मुलांला ‘ब्रेन ट्युमर’ झाला आहे. या कष्टकरी कुटूंबानं बाळाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु केली. एप्रिल महिन्यात त्याच्यावर याबाबतची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. पण तेव्हापासून त्याची नजर गेली. आवाजावरून तो माणसे ओळखत असे. मंगळवारी तब्येत बिघडल्याने त्याला एका बालरोग तज्ञाकडे दाखल केले होते.
यावेळी घरी असलेल्या दोघं बहिणींनी भावाला दवाखान्यात बघण्यासाठी नेण्याचा वडीलांकडे आग्रह धरला. तेंव्हा वडीलांना मुलींना समजावत सांगितले, उद्या रक्षाबंधन आहे, मी भैयाला सकाळी घरी घेवून येतो. तुम्ही त्याला राखी बांधून त्याचे औक्षण करा. मुलींनी वडिलांचे म्हणणे ऐकून दवाखान्यात जाण्याचा हट्ट सोडला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. रात्री चिमुकल्या आरोहनची तब्बेत अचानक बिघडली आणि पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. घरी रक्षाबंधनासाठी वाट पहात बसलेल्या बहिनींना भावाच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. कुटुंबियांनी फोडलेला टाहो सर्वांची ह्दय पिळवटून टाकणारा होता.