जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलेले असतांना दुसरीकडे त्यांनी बुधवारी रात्री निकटवर्तीयांची गुप्त बैठक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांनी तातडीने दिल्ली गाठली होती. त्यानंतर खासदार रक्षाताई खडसे ह्या देखील दिल्लीला पोहचल्या होत्या. या घडामोडींमुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. परंतू बुधवारी सकाळी खडसे यांनी माध्यमांशी बोलतांना आपण आपल्या सुप्रिम कोर्टाच्या तारखेसाठी दिल्लीला गेलो होतो. तेथे कोणाचीही भेट घेतली नाही, त्यामुळे मी भाजपात जाण्याच्या चर्चेत कोणतेच तथ्य नाही, असे खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते. आपण भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु असा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही, असा निर्णय घ्यावयाचा असला तर, कार्यकर्त्यांना व सहकार्यांना विश्वासात घेवूनच असा निर्णय होत असतो, असेही खडसे म्हणाले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर काही निकटवर्तीयांची गुप्त बैठक घेतली. संध्याकाळपासून खडसे फार्म हाऊसवर थांबून होते. कार्यकर्ते येत होते, चर्चा करुन परत जात होते. यावेळी रोहीणीताई खडसे या देखील उपस्थित होत्या. खडसे यांनी कोणाचे काय म्हणणे आहे, ते जाणून घेतल्याचे कळते. परंतू चर्चेला नेमका तपशील समजू शकला नव्हता. मात्र, बैठक घेतल्याच्या वृत्ताला खडसे यांनी दुजोरा दिल्याचे ‘लोकमत’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.