नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयामध्ये आलेल्या महिलेला स्वतःचे स्पर्म देऊन गर्भवती केलं. याचा खुलासा आता 45 वर्षांनी झाला असून डीएनए टेस्टमुळे सत्य समोर आले आहे. 1977 मध्ये घडलेल्या या घटने प्रकरणी न्यायालयाने डॉक्टरला दोषी ठरवले असून दंड ठोठावला आहे.
अमेरिकेतील फ्लोरियामध्ये राहणारी चेरील रुसो आपला पती पीटर याच्यासोबत 1977 मध्ये डॉक्टर जॉन वॉयड कोट्स याच्या रुग्णालयामध्ये गेली होती. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन प्रोसीजरसाठी एका मेडीकलच्या विद्यार्थ्याचे स्पर्म चेरीलला देण्यात येणार होते. मात्र डॉ. जॉन यांनी मेडीकलच्या विद्यार्थ्याचे स्पर्म देण्याऐवजी आपलेच स्पर्म महिलेला दिले. यातून ती गर्भवती राहिली आणि तिने बाळाला जन्म दिला.
चेरील हिच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला आणि काही वर्षानंतर आपल्या वडिलांचा शोध घेण्याच्या उत्सुकतेपोटी तिने डीएनए टेस्ट केली. यात डॉ. जॉन हाच तिचा पिता असल्याचे उघड झाले. हा प्रकार रुसो दाम्पत्यालाही माहिती झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरविरोधात न्यायालयामध्ये केस दाखल केली. आता या प्रकरणी न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.
न्यायालयाने डॉ. जॉन यांनी दंड म्हणून 5.25 मिलियन डॉलरचा (जवळपास 40 कोटी रुपये) दंड ठोठावला असून ही रक्कम रुसो दाम्पत्याला देण्याचे आदेश दिले आहे. डॉ. जॉन यांचे सध्याचे वय 80 असून सुरुवातीला त्यांनी चेरीलच्या मुलीचा बाप असल्याचे नाकारले होते. मात्र डीएनए टेस्टमुळे सर्व भांडाफोड झाला. चेरीलचे वकील सेलेस्टे लारमी यांनी न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. तर डॉ. जॉन यांच्या वकिलाने हा निर्णय हैराण करणारा असून आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.
















