नागपूर (वृत्तसंस्था) हैदराबादवरून नागपूरकडे येणाऱ्या चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटल्याने कार ब्राह्मणी शिवारातील बोरखेडी पुलावरून पंधरा फूट खाली रेल्वेलाइनवर कोसळली. ही घटना २ जुलैला सकाळी ७.३० वाजता घडली. मोहम्मद सादिक (३२), साईद युसूफ (३५, दोघेही रा. हैदराबाद) अशी गंभीर, तर श्रेया बैस (२९), कविशा काकडे (२७), बोनधूत रोगो (२४. तिघेही रा. नागपूर) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत.
हैदराबादवरून नागपूरकडे जाणाऱ्या कार ही वेगाने येत असताना अचानक चालक युसूफ याला झोपेची डुलकी लागली. यानंतर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार नागपूर-मुंबई रेल्वेलाइनवर पुलावरून पंधरा फूट खाली कोसळली. हा अपघात इतका भयंकर होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. परंतू सुदैवाने प्राणहानी झाली नाही. अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना बुटीबोरी येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
पोलिसांनी या अपघाताची माहिती नागपूर आणि वर्धा रेल्वे अधिकाऱ्यांना देऊन काही वेळेसाठी या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या बंद केल्यामुळे अनर्थ टळला. या अपघतात मोहम्मद सादिक, साईद युसूफ हे गंभीर तर श्रेया बैस, कविशा काकडे, ब्रोनधूत रोगो हे किरकोळ जखमी झाले. महामार्ग पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रवाना केले होते. सर्वांवर बुटीबोरी येथील मावा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. या अपघातात रेल्वेच्या हायव्होल्टेज इलेक्ट्रिक लाईनचा पोलही उखडून रुळावर पडला होता. त्यामुळे नागपूरहून वर्ध्याकडे जाणारा ट्रॅक बंद करण्यात आला आहे.