नागपूर (वृत्तसंस्था) फक्त खुर्चीवर बसण्याच्या वादातून एका ज्युनियर वकिलाने सीनिअर वकिलाला रक्तबंबाळ होईपर्यंत खुर्चीने मारहाण केली. ही घटना जिल्हा न्यायालयात सोमवारी दुपारी घडली. ॲड. वसंता उमरे, असे जखमी झालेल्या वकिलाचे नाव आहे.
अॅड. उमरे जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतात. ते जिल्हा न्यायालयातील सहाव्या माळ्यावर असलेल्या बार रूम नंबर ६२४ येथे बसतात. सोमवारी दुपारी बाहेरगावावरून एक ज्युनियर वकील जिल्हा न्यायालयात आले आणि सहाव्या माळ्यावर असलेल्या रूम नंबर ६२४ मधील अॅड. उमरे यांच्या खुर्चीवर बसून अर्ज लिहित होते. यावेळी अॅड. उमरे यांनी त्या ज्युनियर वकिलास खुर्चीवरून उठायला सांगितले असता ज्युनियर वकिलाने त्यांना अर्ज लिहिस्तोवर थांबा म्हटले.
यादरम्यान, अॅड. उमरे यांनी माझ्या खुर्चीवरून उठ, मला बसू दे, अशी विनंती त्या ज्युनियर वकिलाला केली. परंतु त्यांच्यात याच मुद्द्यावरून वाद झाला. असता अॅड. उमरे यांनी ज्युनियर वकिलाला प्रथम मारहाण केल्याचे कळते. त्यामुळे ज्युनियर वकिलाने खुर्ची उचलून अॅड. उमरे यांच्या डोक्यावर मारली.
यात अॅड. उमरे रक्तबंबाळ झाले असता त्यांच्यावर न्यायालयाच्या क्लिनिकमध्ये प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अॅड. उमरे यांना मारहाण कोणी केली, असे विचारले असता त्यांनी ज्युनियर वकिलाचे नाव पोलिसांना सांगितले नाही. अॅड. उमरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्यास नकार दिला. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.