कोल्हापूर (वृत्तसंस्था) घाटकरवाडी (ता. आजरा) जवळील जंगलात टस्कर हत्तीने अचानक केलेल्या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील (५४, रा. गवसे, ता. आजरा) हे मृत्यूमुखी पडले. त्यांना हत्तीने सोंडेमध्ये धरून दोन वेळा आपटले. तसेच त्यांच्या पोटावर पाय दिला.
गेले १५ दिवस घाटकरवाडी परिसरात टस्कर तळ ठोकून होता. गेल्या १५ दिवसांत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान या टस्कराकडून झाले होते. शनिवारी वन खात्यातील सुमारे १५ कर्मचारी बाधित क्षेत्र असल्यामुळे जंगल फिरती करण्यास गेले होते. सुळेरान हद्दीतील माधवगिरी येथील कोंडीगोंड नावाच्या परिसराजवळ टस्कर हत्ती झुडपामध्ये लपलेला होता.
प्रकाश पाटील हे पुढे, तर इतर कर्मचारी मागील होते. अचानकपणे टस्कर समोर समोर आला अन् पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांना सोंडेमध्ये धरून दोन वेळा आपटले. त्यांच्या पोटावर पाय दिला. त्यामुळे पाटील हे गंभीर जखमी झाले. पाटील यांच्यावर हल्ला केल्यानंतर टस्कर कर्मचाऱ्यांच्या मागे लागला. कर्मचाऱ्यांनी कसाबसा आपला जीव वाचवला. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती गवसे येथील ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच वन खात्याच्या हलगर्जीपणामुळे प्रकाश पाटील यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप करत रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, हत्तीच्या हल्ल्यात मृत झालेल्या पाटील यांचा वनशहीद दर्जाचा प्रस्ताव तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात आली.
















