मुंबई (वृत्तसंस्था) मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ‘पॉवर कट’मध्ये चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील एका प्रसिद्ध दैनिकानं केला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, ‘तो घातपातच होता’, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं.
मागील वर्षी १२ ऑक्टोबरला मुंबईत सकाळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याचा मोठा फटका रुग्णालये, शेअर बाजार व अन्य सेवांना बसला होता. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला होता. यामागे काही घातपाताचा संशय असावा, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळं ही शक्यता खरी ठरली आहे. त्या ‘पावर कट’मध्ये चीनचा हात होता. गलवान खोऱ्यातील संघर्षाची किनार या घातपातास होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या संदर्भातील सायबर सेलचा अहवाल आज जाहीर करण्यात येणार आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात माहिती देताना, सायबर विभागाकडून सायंकाळी या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण देईल, असे आज विधिमंडळात सांगितलं. ”मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचं सूतोवात मी केलं होतं. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी ६ वाजता अहवाल देण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आलाय, त्यासंदर्भातही सर्व माहिती मी तिथेच देईल,” असेही राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे, मुंबई ब्लॅक आऊटचा नेमका घातपात काय होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता मुंबईसह महाराष्ट्राला लागली आहे.