नागपूर (वृत्तसंस्था) सर्वत्र ‘फादर्स डे’ साजरा केला जात असताना बापलेकांत झालेला वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या वडिलाने दारूच्या नशेत पानठेल्यात झोपून असलेल्या पोटच्या मुलाला काठीने मारहाण करून संपविले. यानंतर मुलाने गळफास लावून आत्महत्या केली हे दाखविण्यासाठी मुलाच्या गळ्याला नायलॉन दोरीने आवळून आत्महत्या केल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही घटना मौदा तालुक्यातील बोरगाव येथील जुना पत्कर नाका परिसरात १८ जूनला दुपारी दोन वाजता घडली.
नेमकं काय घडलं !
अश्विन रतन शेंडे (२५) असे मृतकाचे तर रतन शेंडे (५०, दोघेही रा. धानला) असे आरोपी वडिलाचे नाव आहे. आरोपीला अश्विन हा एकुलता एक मुलगा होता. तो मौदालगतच्या एका कंपनीमध्ये रोजंदारीने काम करायचा. आरोपी शेतीचे काम, तर त्याची पत्नी वनमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. दारूच्या नशेत नेहमी दोघांमध्ये भांडणे होत असे. भांडण झाले की, अश्विन वडिलाला मारायचा. रविवारी तो दारू पिल्यानंतर पानठेल्यात झोपला होता. याबाबत माहिती आरोपीला मिळाली. हीच संधी साधून संतापलेल्या वडिलाने झोपलेल्या मुलाची काठीने मारहाण करून हत्या केली.
आत्महत्या केल्याचा रचला बनाव !
अश्विन तीन, चार दिवसांपासून रतनची गाडी घेऊन दारू प्यायला बोरगाव येथे जायचा. त्यामुळे त्या दोघांमधील वाद विकोपास गेल्याने रतनने अश्विनीला संपविण्याचा कट रचला. त्याने अश्विनला जबर मारहाण केली. त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाला नसून, त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रतनने केला होता. मुलाने गळफास लावून आत्महत्या केली, हे दाखविण्यासाठी त्याच्या गळ्याला नायलॉन दोरीने आवळून आत्महत्या केल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न बापाने केला. मात्र त्याने रचलेला कट फसला. घटनेच्या तीन दिवसांपूर्वी दोघांत गाडी नेण्यावरून वाद झाला होता. अश्विन तीन दिवसांपासून वडिलांची गाडी घेऊन जात होता. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. रविवारी हा वाद विकोपाला गेला होता. यातूनच आरोपीने मारहाण करून हत्या केल्याचे कळते.