सोलापूर (वृत्तसंस्था) मुलीला सासरी सोडण्यासाठी चाललेल्या पित्याच्या कारला टेम्पोने धडक दिल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर डोक्याला मार लागून मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरूवार दि. २९ जून रोजी दुपारी ३.४५ च्या सुमारास जत रोडवरील चव्हाण मळा सोनंद (ता. सांगोला) येथे झाला. सुरेश मारुती बोबलादे (वय ५४) असे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या पित्याचं नाव आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार सुरेश बोबलादे यांची मुलगी भक्ती हिचा दि. २९ मे रोजी बाळगिरी (ता. अथणी) येथील प्रभू संक्रट्टी यांच्याशी विवाह झाला होता. विवाहनंतर मुलगी माहेरी आली होती. तिला सासरी सोडण्यासाठी वडील सुरेश मारुती बोबलादे हे मुलगी भक्ती प्रभु संक्रट्टी हीस तिच्या माहेरी (बाळेगिरी ता अथणी, जि. बेळगांव) येथे सोडण्यासाठी दि. २९ रोजी दुपारी ३.४५ वा. च्या सुमारास स्वतः कार (क्र. एम. एच. १३/बी. एन. ५७६३) मधून स्वतः चालवीत निघाले होते. यावेळी जत रोडवरील चव्हाण मळा सोनंद ता. सांगोला येथे आले असता समोरून येणाऱ्या ४०७ टेम्पो (क्र. एम. एच. १० / ए. ५९१५) या वाहन चालकाने त्याच्याकडील टेम्पो भरधाव वेगात चालवून समोरुन जोराची धडक दिली.
यामध्ये कार चालक सुरेश मारुती बोबलादे यांना जबर मार लागला. अपघातानंतर त्यांना तात्काळ सांगोला येथील दक्षता हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरनी सुरेश बोबलादे हे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. तर मुलगी भक्ती प्रभु संक्रट्टी हिस गंभीर मार लागल्याने तिला पुढील उपचारासाठी मिरज येथील हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले आहे. याबाबत शुभम सुरेश बोबलादे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकाविरुध्द सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.