खांडवा (वृत्तसंस्था) एका इसमाने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. यामुळे संतापलेल्या वडिलांनी आरोपीचे तुकडे तुकडे करून नदीत फेकले. ही खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी आणि मामाने बलात्कार करणाऱ्याची हत्या केली.
मासे कापण्याच्या धारदार शस्त्राने केली हत्या
त्रिलोकचंद (५५, रा. सक्तापूर, मध्य प्रदेश) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. त्रिलोकचंद याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. त्यामुळे चिडलेल्या मुलीचे वडील व मामा बदला घेण्याच्या हेतूने त्रिलोकचंद याला दुचाकीवर बसवून अजनाल नदीच्या दिशेने घेऊन गेले. नंतर मासे कापण्याच्या धारदार शस्त्राने त्रिलोकचंदची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले आणि नदीत फेकून दिले, असे उपविभागीय अधिकारी राकेश यांनी सांगितले..
तरंगणाऱ्या मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो व्हायरल
त्रिलोकचंद याचा मृतदेह अजनाल नदीत वाहून जात असल्याचे आढळून आले. जिल्हा मुख्यालयापासून नदीचे अंतर सुमारे ४० किलोमीटर आहे. सोशल मीडियावर तरंगणाऱ्या मृतदेहाच्या तुकड्यांचे फोटो व्हायरल होऊ लागल्यावर हे प्रकरण समोर आले, असे पोलीस अधिकारी विवेक सिंह यांनी सांगितले.
त्रिलोकचंद याच्या हत्येप्रकरणी आरोपी वडील आणि मामा यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात इतरांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मृत आणि आरोपी दोघेही नातेवाईक आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.