जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काऊ कोल्हे विद्यालयाजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत आज (गुरुवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. याबाबत शनिपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यानंतर दरोड्याच्या घटनेचा संपूर्ण थरार समोर आला आहे. दरोडेखोरांनी अवघ्या काही मिनिटात अगदी सगळं ठरल्यागत बँकेत येत साडेतीन कोटींच्या दागिन्यासह १७ लाखांहून अधिकची रोकड फिल्मी स्टाईल लुटून नेली.
काळे हेल्मेट कपडेही काळेच !
बँक व्यवस्थापक राहुल मधुकर महाजन (रा.एम.जे कॉलेजसमोर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दि. १ जून रोजी ते नेहमी प्रमाणे सकाळी ९.४५ वाजता बँकेत गेले. तेव्हा बँकेचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा ठोकल्या नंतर दरवाजा कोणीतरी उघडला. आत गेल्यानंतर दोन काळे हेल्मेटधारी तसेच काळ्या रंगाचे शर्ट घातलेले इसमांनी दरवाजा मागून येत राहुल महाजन यांना पकडून वॉशरूमकडे मारहाण करीत घेऊन गेले. त्याठिकाणी कॅश इन्चार्ज देवेंद्र नाईक हे बसलेले होते. त्यांच्या तोंडाळा चिगट पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्यांच्या जवळच हाऊस कीपिंग मनोज सुर्यवंशी व सिक्युरीटी गार्ड यांना देखील तोंडावर चिगटपट्टी बांधून बसवून ठेवलेले होते.
चाकूच्या धाकावर उघडायला लावली कॅश आणि गोल्ड रूम !
अज्ञात दरोडेखोरांनी व्यवस्थापक महाजन यांच्या डोळ्यावर स्प्रे मारुन चाबी-चाबी असे बोलून मारहाण करायला लागले. त्यांनी बॅगेत चावी आहे, असे सांगितले तेव्हा महाजन यांनी बॅगेतून चाबी काढून दरोडेखोरांना दिली. त्यानंतर दोघं दरोडेखोर महाजन यांना कॅश रूमकडे घेवुन गेले. त्या ठिकाणी त्यांनी मनोज सुर्यवंशी यास कॅश रुमकडे आणले. त्यांनी मनोजला चाकूच्या धाक दाखविला. त्यामुळे मनोजने त्यांना कॅश रूम उघडुन दिली. यावेळी महाजन यांनी दोघां दरोडेखोरांपैकी एकाशी झटापटी केली. त्यावेळी त्यांचे डोक्यातील हेल्मेट खाली पडले आणि घडताच त्याने महाजन यांच्या मांडीवर चाकूने वार केले. यावेळी महाजन यांनी मनोजला ओरडून सांगितले की, याला पकड़ याला पकड पण त्याने पकडले नाही. दरोडेखोराने तिजोरीमधून रोकड काढली आणि त्यांने व्यवस्थापक महाजन यांना मारहाण करुन पोटावर चाकू लावत गोल्ड तिजोरी देखील उघडायला लावली.
दोघांनी काळ्या बॅगमध्ये रोकड व सोने टाकले !
दरोडेखोराने गोल्ड तिजोरीमधील सर्व खाते उघडे करण्यास लावत. त्यातील सर्व गोल्ड बॅग काढून घेतल्या. यावेळी त्याचा दुसरा साथिदार सुध्दा त्या रूममध्ये आला आणि त्या दोघांनी काळी बॅगमध्ये कॅश व सोने टाकले. यानंतर दरोडेखोरांपैकी एका जाड इसमाने व्यवस्थापक महाजन यांना इशारा करून त्यांच्या मोटार सायकलची चाबी चाकू लावून बळजबरीने हिसकावून घेतली. तर मनोजला बॉशरूमकडे पाठवून महाजन यांना कॅश रूममध्ये भिंतीकडे तोंड करायला लावुन बसवुन ठेवले. यानंतर कॅश रुम बाहेरुन लावून निघून गेले. संपूर्ण चौकशी अंती दरोडेखोरांनी बँकेचे सुमारे १७ लाख रुपये आणि ३ ते ४ कोटी रुपयाचे सोने लुटून पोबारा केला. दरोदेखोरांचा बँकेत घुसल्यापासून तर रोख रक्कम, दागिने पळवून नेण्यापर्यंतचा थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यामुळे अगदी सगळं ठरल्यागत हा फिल्मी स्टाईल दरोड्याचा थरार घडल्यामुळे शंकेची पाल चुकचुकत आहे.
दरोडेखोरांच्या शोधार्थ पथक रवाना ; संशयितांची चौकशी सुरु !
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच दोन ते तीन पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात रवाना झाली आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार काही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी करायला देखील सुरुवात केली असल्याचे कळते. दरम्यान, प्लानिंग तसेच कुणाच्या तरी माहिती शिवाय एवढ्या मोठ्या दरोडा घालणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. तर एलसीबीची टीम संशयितांची सर्व बाजूने चौकशी करत आहे.