नांदेड (वृत्तसंस्था) तालुक्यातील मोरगाव येथील विद्यार्थिनी भोकर येथे कॉलेजला जाण्यासाठी सकाळच्या वेळी निघाली. परंतू रस्ता ओलांडून जात असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाने तिला चिरडल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. देवजी चिरकुटलेवाड (१७) असे मयत मुलीचे नाव आहे. दरम्यान, महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली.
नांदेड-किनवट हा राज्य रस्ता झाल्यापासून भोकर – हिमायतनगर या मार्गावर वाहनांचा वेग वाढला असून, भरधाव येणाऱ्या वाहनाने अनेक अपघात घडत आहेत. मंगळवारी सकाळी ८ वाजता मोरगाव येथील पूजा ही अकरावीच्या वर्गात कॉलेजला पहिल्याच दिवशी जात होती. मोरगावहून भोकर १२ किलोमीटरचे अंतर आहे. सकाळी भोकरकडून भरधाव वेगाने मालवाहतूक ट्रक (एमएच २८. डी ०२८४) चालकाच्या निष्काळजीपणामुळे पूजा ट्रकखाली चिरडली गेली. घटनेनतंर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
घटनेचे वृत्त समजताच वडगाव येथील तरुणांनी मोबाइलवर पोटा बु. येथील तरुणांशी संपर्क साधून अपघाती ट्रकला पोटा बुक बस स्टॉपवर पकडण्यात यश आले. चालक ट्रक सोडून पसार झाला. होता. परंतू हिमायतनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
तामसा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दळवी, बिट जमादार जोगदंड, सुर्यवंशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह भोकरच्या रुग्णालयात पाठविण्यात आला. मोरगाव येथील देवजी महाराज यांना एकुलती एक मुलगी होती. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलत्या एक मुलीचा मृतदेह बघून कुटुंबियांनी काळजी चिरणारा आक्रोश केला होता.
















