जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गिलियन बॅरे सिंड्रोमचा (जीबीएस) पहिला रुग्ण आढळला आहे. जळगाव शहरातील एका ५० वर्षीय महिलेला या आजाराची लागण झाली आहे. सदर महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
महिलेची प्रकृति स्थिर असली तरी आजाराचा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मास मच्छी, दुध सारखे पदार्थ टाळा!
यावेळी पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, गिलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा आजार संसर्ग जन्य नाही, दुषित अन्न व पाण्यामुळे हा आजार होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी मास मच्छी, दुध सारखे पदार्थ शक्यतो टाळावे, त्यातून हा आजार होण्याच भिती असते. पाय दुखणे व हगवण लागणे ही या आजाराची लक्षणे असून हातापायांचे स्थायू कमजोर होतात, डायरीया होतो, त्यामुळे मुले शाळेतून आल्यानंतर जर असे लक्षणे दिसत असतील किंवा मुले असा त्रास होत असल्याचे सांगत असतील तर, पालकांनी तातडीने उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले. तसेच या आजारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.