मुंबई प्रतिनिधी । सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह चारही मनसैनिकांची आज कल्याण रेल्वे कोर्टाने जामिनावर सुटका केली. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या बॉण्डवर ही सुटका करण्यात आली असून न्यायालयातून बाहेर आल्यावर संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली.
या आंदोलनादरम्यान सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र सरकारच्या अशा कोणत्याही धाकदपटशहाला आम्ही बळी पडणार नाही, मनसैनिक त्याला अजिबात घाबरणार नाही. आम्ही जे केलं ते लोकांसाठी केलं आहे. तसेच सरकार डोक्यावर बंदूक ठेवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही सामान्य जनतेसाठी भांडत असून सरकारला याप्रकरणी निर्णय घ्यावाच आहे. लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु आहे. इतर लोकांना बसने प्रवास करावा लागतो आहे. बस प्रवासात लोकांची मोठी गर्दी होत आहे. चाकरमान्यांना बसमधून प्रवास करण्यासाठी 2-2 तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. त्यामुळे अनेकांचे मोठे हाल होत आहेत. यापूर्वी मनसेकडून मुख्यमंत्र्यांना रेल्वे सुरु करण्यासाठी पत्रही पाठवण्यात आलं होतं.
मनसेकडून रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी, सरकारला वारंवार विनंती करण्यात आली आहे. मात्र सरकार अद्यापही रेल्वे सुरु करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदालापूर, पालघरपासून येणाऱ्या अनेक लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. विनंती करुनही सरकार ऐकत नसल्याने आंदोलन केल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले.