मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपालांची भेट घेणार होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईत नसल्याने ही भेट टळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडी सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार होते. यावेळी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींसंदर्भात महाविकासआघाडी सरकारकडून स्वत:ची बाजू मांडली जाणार होती. मात्र, राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपलब्ध नसल्याचे कळवण्यात आले आहे. ते २८ मार्चपर्यंत देहरादूनमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांना आणखी काही काळ राज्यपालांच्या भेटीसाठी ताटकळत राहावे लागणार आहे. यावरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
कालच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. जवळपास तासभर भाजपचे नेते आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली होती. या भेटीत भाजपने राष्ट्रपती राजवटीविषयी चर्चा केली की नाही, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, या सगळ्यानंतर महाविकासआघाडीचे नेते सावध झाले होते. त्यामुळेच महाविकासआघाडीच्या नेत्यांना गुरुवारी राज्यपालांची भेट घ्यायची होती. मात्र, तुर्तास ही भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे आगामी तीन दिवसांत काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार का, याकडे सर्वांच्य नजरा लागल्या आहेत.