नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतातील आघाडीची फूड डिलीव्हरी कंपनी Zomato सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर कंपनी वादात अडकली आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत ग्राहकाने केलेल्या चॅटचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर #Reject_Zomato हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागलाय.
फूड डिलिव्हरी अॅप Zomato पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. कंपनीच्या एका एक्झिक्युटिव्हसोबत कस्टमरच्या चॅटचा एक स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होत आहे. तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं Zomato एक्झिक्युटिव्ह कडून आपल्याला हिंदी शिकण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. “कस्टमर केअरसंच असं म्हणणं आहे की मला हिंदी येत नसल्यामुळे आम्ही रिफंड करू शकत नाही. त्यांनी मी खोटा असल्याचंही म्हटलं. याशिवाय कर्मचाऱ्यानं हिदी ही आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना ती थोडी तरी आली पाहिजी असं म्हटलं,” असा आरोप विकास नावाच्या एका व्यक्तीनं स्क्रिनशॉट शेअर करत केला. यानंतर अनेकांनी Zomato ला हिंदी ही आपली राष्ट्राभाषा आहे का असा प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. याविरोधात युझर्सनं आता सोशल मीडियावर एक मोहीम सुरू केली असून #Reject_Zomato हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तसंच अनेकांनी Zomato नं यावर स्पष्टीकरण द्यावी अशी मागणीही केली आहे.
काय आहे प्रकरण?
#Reject_Zomato या ट्रेंडची सुरूवात विकास नावाच्या एका युझरपासून झाली. त्यांच्या ट्वीटनुसार त्यानं ऑर्डर केलेल्या पदार्थांपैकी एक पदार्थ त्याला मिळाला नव्हता. त्यानं अॅपवर यासंदर्भात कस्टमर केअरशी संवाद साधला. त्यावेळी त्यानं रिफंडची मागणी केली. दरम्यान, त्यानं शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार संबंधित कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला तो ज्या भाषेत बोलत होता ते समजत नसल्याचं दिसून येत आहे. त्यावर विकासनं जर झोमॅटो तामिळनाडूमध्ये उपलब्ध आहे तर अशा व्यक्तींना त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे ज्यांना स्थानिक भाषेचं ज्ञान आहे, असं त्यानं म्हटलं. यावर उत्तर देताना एक्झिक्युटिव्हनं हिंदी आपली राष्ट्रभाषा असून सर्वांना थोडंफार हिंदी तर आलंच पाहिजे असा रिप्लाय दिला.