नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांवर या लाटेचा परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सप्टेंबरपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळणार असल्याची शक्यता असल्याचे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. यासह ते म्हणाले की फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते. एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये दोन ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी सध्या सुरु आहे. डीसीजीआयने १२ मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती.