नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत घट होताना दिसत आहे. परंतु, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा दररोज समोर येणारा आकडा भयावह आहे. गेल्या २४ तासांत ९४,०५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ६१४८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात एका दिवसातल्या सर्वाधिक म्हणजे ६,१४८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आता मृतांचा आकडा तीन लाख ५९ हजार ६७६ झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातल्या मृत्यूंची संख्या तीन हजारांच्या खाली आली होती. मात्र, आता झालेली वाढ चिंताजनक आहे. देशातला मृत्यूदर आता १.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
देशातल्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ झालेली दिसून येत आहे. काल दिवसभरात देशात ९४ हजार ५२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे सध्या उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा आता ११ लाख ६७ हजार ९५२ वर पोहोचला आहे. तर काल दिवसभरात देशातले एक लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले.
देशात काल दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी ३० लाख ६५ हजार ९५१ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, तीन लाख १३ हजार ३१० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे.
राज्यातली स्थिती
राज्यात काल कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल १० हजार ९८९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल १६ हजार ३७९ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात १०२१९ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५५,९७,३०४ इतकी झाली आहे.