कराची (वृत्तसंस्था) टिकटॉकवरचे व्हिडीओ हा इंटरनेटवरचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे. पण याच व्हिडीओच्या नादात एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतकंच नव्हे तर या सगळ्या प्रकारात या महिलेच्या आईचाही हकनाक बळी गेला आहे. ही घटना पाकिस्तानमधील कराची इथली आहे. व्हिडिओ अपलोड करण्यावरून संताप अनावर झाल्याने पतीने पत्नी व पत्नीच्या आईची गोळ्या झाडून हत्या केली.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या महिलेचे नाव रेश्मा आहे. रेश्मा टिकटॉकवर सातत्याने व्हिडिओ अपलोड करत असे. त्यावरून पती-पत्नींमध्ये वाद होत असे. रेश्मा संमतीशिवाय घराबाहेर पडायची आणि अनेकांशी फोनवरून बोलत असे त्यावरून आरोपी इशाक आणि तिच्यात भांडणे व्हायची असे पोलिसांनी सांगितले. सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे रेश्मा माहेरी आली होती. रविवारी आरोपी इशाक तिच्या घरी गेला होता. इशाकने तिथे पत्नी रेश्माची आणि सासूची गोळ्या झाडून हत्या केली. यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर, पत्नी व सासूची हत्या केल्यानंतर आरोपी इशाक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.