नंदुरबार (प्रतिनिधी) जादूटोणा करून एका तरुणासह ५० वर्षीय महिलेला मारून टाकल्याच्या संशयातून पती-पत्नीला स्मशानातील राख खाऊ घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मोलगी पोलिसांत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील ५० वर्षीय महिलेने जादूटोणा करून ओजमा नवसा वसावे यांच्या मुलाला व खेमा नवसा वसावे यांच्या पत्नीला मारल्याचा संशयातून गावातील काही जणांनी पीडित महिला व तिच्या पतीला त्रास देणे सुरू केले. १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान पती-पत्नीला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना तांत्रिक पूजा करायला भाग पाडले. तसेच, स्मशानात नेऊन राख खाऊ घातली.
या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या व प्रचंड दहशतीत आलेल्या महिलेने व तिच्या पतीने अखेर पोलिस ठाणे गाठले. तेथे आपबीती कथन केल्यानंतर फिर्याद दाखल केली. महिलेच्या फिर्यादीवरून ओजमा नवसा वसावे (५८), गुला ओजमा वसावे (३०), ईल्या ओजमा वसावे (२८), खेमा नवसा वसावे (५२), चंद्रसिंग खेमा वसावे (२७, सर्व रा. अक्कलकुवा) व बावा ओल्या पाडवी (५५, अक्कलकुवा) यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिले आहे.