अमळनेर (प्रतिनिधी) सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यानी लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली.
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अर्जुन आत्माराम बोरसे यांना सेवानिवृत्तीची रक्कम मिळाली होती. त्यातून त्यांना मुलगा आणि मुलगी यांना पैसे पाठवायचे असलेले १ लाख ४५ हजार रुपये रक्कम दि. ११ रोजी दुपारी १२ वाजता पिशवीत घेऊन ते स्टेट बँकेत भरणा करायला गेले होते. सुरुवातीला मुलीच्या खात्यावर ४५ हजार रुपये भरले आणि तेवढ्यात तेथे जवळच असलेल्या दोन तरुणांनी चलाखीने पिशवीला ब्लेड मारून त्यातील एक लाख रुपये काढून नेले. मुलीला पैसे टाकल्यानंतर मुलाच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी पिशवीला हात लावताच हा प्रकार उघडकीस आला. घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी बँक व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक पाठवले आहे.