मुंबई (वृत्तसंस्था) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते आज विधानसभेत म्हणाले की, आता मला वाटते की भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या सर्व टीकेला सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचं नाव बदलण्यावरूनही राज्यातील विरोधी पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला. उद्धव ठाकरे म्हणाले,”टीम इंडिया आता प्रत्येक सामना जिंकणार, कारण स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम असं बदलण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसताना तुम्हाला लाज वाटत नाही?”. ते पुढे म्हणाले की, भाजप सर्व महापुरुषांना आपले म्हणत आहे. सरदार वल्लभभाई पटेल असो वा सावरकर. उद्धव ठाकरे म्हणाले, “आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी करण्यात आले आहे. आम्ही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ठेवले आहे आणि त्यांनी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलले आहे. ते पुढे म्हणाले, की “आम्हाला तुमच्याकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणारचं, अशी आम्ही आपल्याला खात्री देतो.”
विरोधक बोलत असताना मी नटसम्राट बघतोय असा भास झाला. शेवट केविलवाणा वाटला. कुणी किंमत देता का किंमत. सुधीरजी, काय तुमचा आवेश. चंद्रकांतदादा आणि देवेंद्रना भीती वाटायला लागली. माझ्यासारखं तुमचंही झालंय. कलागुणांना वाव मिळत नाही. मी फोटोग्राफर आहे, पण सध्या ते करता येत नाही… कलाकार हा कधी लपून राहत नाही, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना काढला.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती मागणी
१९८८ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांनी रॅलीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली होती. तेव्हापासून शिवसेना नाव बदलण्याविषयी बोलत आहे. आता शिवसेना सत्तेत असून नावात बदल करण्याचा विचार करत आहे. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, फक्त भारत माता की जय बोलण्याने देशप्रेम सिद्ध होत नाही. संघमुक्त भारत करण्याबद्दल बोलणारे नितीशकुमार तुम्हाला डोक्यावर बसायला लागतात, हे तुमचं हिंदुत्व आहे. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की माझ्या महाराष्ट्रातील जनतेने डोळ्यांतील पाणी पुसावे आणि खोटं बोलणाऱ्यांना संपवून टाकावं.
















