चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Chowk) शिवाजी चौकात बसवण्यात आलेला पुतळा लोकार्पण सोहळा घाईघाईने दि. २९ डिसेंबरला भाजपने निश्चित केला. या कृतीचा निषेध व्यक्त करून हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी पालिकेतील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह महाविकास आघाडी व शिवप्रेमी संघटनांनी केली आहे. त्यामुळे शिवपुतळा अनावरणाच मुद्दा चाळीसगावात चांगलाच पेटला असून पुन्हा शिवपुतळ्यामुळे ऐन थंडित राजकिय वातावरण तापणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अनावरण २९ रोजी होत आहे. या पुतळ्याचे काम अजूनही अपूर्णावस्थेत आहे. शिवाय याबाबत कुणालाही विश्वासात न घेता परस्पर भाजपने कार्यक्रम जाहीर केला. या कृतीचा निषेध व्यक्त करून हा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी पालिकेतील शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह महाविकास आघाडी व शिवप्रेमी संघटनांनी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष यांच्या दालनात केली. यात प्रामुख्याने संभाजी सेना, रयत सेना, सह्याद्री प्रतिष्ठान, राष्ट्रीय राजपूत करणी सेना, प्रगत युवा संस्था आदी शिवप्रेमी संघटनांचा समावेश आहे.
नगरसेवकांची कोनशिलावर नावे येण्यासाठीची धडपड
१४ रोजी नगरपालिकेच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाबाबत विरोधी पक्षनेते राजीव देशमुख यांनी विचारणा केली होती. त्यावेळी २९ रोजी बैठक घेऊन त्यात समिती गठित करू व नंतर पुढील कार्यक्रम घेऊ. तोपर्यंत पुतळ्याचे काम पूर्णत्वास येईल, असे सांगितले होते. २९ रोजी अचानक भाजपने कुणालाही विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम जाहीर केला आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. या पुतळ्याची आजूबाजूची सजावट, टाईल, फ्लोरिंग, इलेक्ट्रिक व इतर अनेक कामे अपूर्णावस्थेत असल्याने या पुतळ्याला अजून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. केवळ ३० रोजी नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपल्यामुळे कोनशिलावर नावे येण्यासाठी ही धडपड सुरू आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
एकतर्फी निर्णय का घेण्यात आला?
गेल्या दोन महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे चाळीसगावात जल्लोषात आगमन झाले. त्यावेळी सर्वपक्षीय समिती गठित करण्यात आली होती. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी संघटना, नागरिक सहभागी झाले होते. या सोहळ्यात समिती नेमून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय न घेता एकतर्फी निर्णय का घेण्यात आला? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी आघाडीचे उपनेते सुरेश स्वार, नगरसेवक रामचंद्र जाधव, संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, शिवसेनेचे महेंद्र पाटील, काँग्रेसचे प्रदीप देशमुख, गणेश पवार, खुशाल पाटील, वर्धमान धाडीवाल, नगरसेवक दीपक पाटील, राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील, रोशन जाधव, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
लोकार्पण सोहळ्याची इतकी घाई का?
सर्वांना यात निमंत्रित करून भव्यदिव्य स्वरूपात हा लोकार्पण सोहळा कार्यक्रम घेण्याबाबत सर्वांना अपेक्षित होते. मात्र केवळ भाजपाच्याच नेत्यांची नावे घेऊन लोकार्पण सोहळ्याची इतकी घाई का? असा सभापती अजय पाटील, नगरसेवक भगवान पाटील, शिवसेनेचे अध्यक्ष शामलाल कुमावत यांचा सूर होता.
.. तर काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सोहळा करू
विरोध करूनही २९ रोजी कार्यक्रम झाला, तर पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या जल्लोषात करू, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम रद्द करावा, या मागणीचे निवेदन सोमवारी मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, संभाजी सेना, राष्ट्रीय करणी सेनेने निवेदनाद्वारे करण्यात आली.