भुसावळ (प्रतिनिधी) डाऊन काशी एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणार्या मनमाडच्या एका प्रवाशाकडील 56 हजारांचे दोन मोबाईल काठीचा फटका मारून टोळीने लुटले होते. या घटनेत काठीचा जबर फटका बसल्याने प्रवासी जखमीदेखील झाला होता. या घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी टोळीप्रमुखाला अटक केली आहे. रोहित उर्फ गिरीष उर्फ कचोरी दत्ता चौगुले (21, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिराजवळ, कुसूंबा, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 56 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
मनमाड येथील प्रवासी तथा लॅब टेक्नीशीयन सीमॉन व्हीक्टीर स्वामी (20, संत बार्नबा वसाहत, मनमाड) हे डाऊन काशी 215017 एक्स्प्रेसच्या इंजिनापासूनच्या तिसर्या सर्वसाधारण डब्यातून मनमाड ते भुसावळ असा प्रवास 27 ऑगस्ट 2023 रोजी दरवाज्याजवळ उभे राहून करीत असताना जळगाव ते रेल्वे गेट असोदादरम्यान अज्ञातांनी त्यांना काठीचा फटका मारल्याने ते रेल्वे रूळावर पडून जखमी कपाळाला व डोक्याला मार लागल्याने जमखी झाले.
यावेळी तिघा अनोळखींनी पुन्हा त्यांच्या पायावर काठीने मारहाण करीत त्यांच्याकडील 56 हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल लांबवले होते. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्ग पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रोहित उर्फ गिरीष उर्फ कचोरी दत्ता चौगुले (21, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिराजवळ, कुसूंबा, जि.जळगाव) यास निष्पन्न करीत त्यास अटक केल्यानंतर त्याच्याकडून 35 व 21 हजार रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले तसेच गुन्ह्यात वापरलेली काठी जप्त केली. या गुन्ह्यातील दोन संशयित अद्याप पसार असून त्यांचा कसून शोध सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक मारोती पंडित, लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भाऊसाहेब मगरे, हवालदार धनराज लुले, हवालदार अजित तडवी, हवालदार जगदीश ठाकूर, हवालदार दिवाणसिंग राजपूत, शिपाई मिर्झा तसेच आरपीएफ आरक्षक महेंद्र कुशवाह, विनोल रावल, दीपक शिरसाठ आदींच्या पथकाने केली.