जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही महाजनांना आरोप केले होते. तसेच आता राजकारणात यश-अपयश येत असते. जळगाव महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता गेली असली तरी पक्षाचे नेते, माजी मंत्री गिरीश महाजन अपयशी झाले, असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.
जळगाव महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे २७ नगरसेवक फुटले आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला मतदान केले आहे. त्यामुळे महापालिकेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. तसेच या प्रकरणावर खडसे यांच्या सूनबाई व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी मात्र नेते गिरीश महाजन यांची पाठराखण केली आहे. जळगावात संकटमोचक गिरीश महाजन अपयशी ठरले आहेत, असे आपणास वाटते का? याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, राजकारणात यश अपयश येतच असते. जळगाव महापालिकेत नेत्यांचे व भाजप नगरसेवकाचे चुकले असल्यास भविष्यात असे होऊ नये, यासाठी आता पक्षातर्फे काळजी घेतली जाईल. मात्र, सत्ता तिकडे प्रवाह असतो, हे राजकारणात साधारण दिसून येते. जळगाव महापालिकेत तेच घडले आहे. तरीही भारतीय जनता पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईलच, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना फुटीर नगरसेवकांना दिला.