धुळे (प्रतिनिधी) घाणेगाव तालुक्यातील साक्री येथील तरुणाला मिनी बँकेची फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून २ लाख ३० हजार २०० रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर आलेल्या जाहिरातीमुळे ही ऑनलाईन लूट झाली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते २५ ऑक्टोबर दरम्यान वेळोवेळी ही फसवणूक झाली. कुणाल अर्जुन महाले (वय २७, रा. घाणेगाव, ह. मु. फोफरे, ता. साक्री) असे या तरुणाचे नाव आहे. कुणाल याने त्याच्या फेसबूक अकाऊंटवर २२ सप्टेंबर रोजी ऑक्सिजन सर्व्हिस इंडिया प्रा. लि. या मार्केटप्लेसची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्याने मिनी बँक सुरू करण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला. त्यानंतर ८ ऑक्टोबर रोजी १५ हजार ८०० रुपये सर्व्हिस चार्ज भरावा लागेल, असे सांगण्यात आले. तसेच पैसे जमा करण्यासाठी त्याने बँक अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोडदेखील दिला. या अकाऊंटरवर कुणालने वेळोवेळी एकूण २ लाख ३० हजार २०० रुपये जमा केले. एवढ्या रकमेचा भरणा करुनही मिनी बँक सुरु करण्याची कोणतीही कागदपत्रे वा परवाना न आल्याने फसवणूक झाल्याचे कुणालच्या लक्षात आले. त्याच्या फिर्यादीवरून राम नारायण अजबे याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर क्राइमचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे तपास करत आहेत.