नाशिक (वृत्तसंस्था) शेअर बाजारात कंपनीचा ब्रोकर असल्याचे भासवून शेअर गुंतवणुकीवर जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल ५२ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र संजय भागवत (रा. भागवत मळा, सामनगावरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भागवत यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांशी गेल्या मार्च महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. फिनव्हिजाड टेक्नॉलॉजी प्रा. लिक या स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासवून हा गंडा घालण्यात आला. एफटीपीएल-पीएम हे मोबाईल अॅप डाऊन लोड करण्यास भाग पाडून भामट्यांनी इन्स्टीट्यूशल ट्रेडिंग अकाऊंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेंडिग व आयपीओ कन्फर्म अॅलोटमेंटचा बहाणा करून गुंतवणुकदारांना अल्पावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
विश्वास बसलेल्या गुंतवणुकदारांना दि. ७ मार्च ते २३ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल ५१ लाख ७२ हजार ३९४ रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात भाग पाडल्यानंतर ही फसवणूक झाली. याप्रकरणी रवींद्र संजय भागवत यांच्या फिर्यादीनुसार सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत. महिना उलटूनही नफ्याची आणि मुद्दल रक्कमही पदरात न पडल्याने दोघा गुंतवणुकदारांनी संशयितांशी संपर्क केला. मात्र संशयितांसोबत कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या दोघांनी पोलिसांत धाव घेतली.