अमरावती (वृत्तसंस्था) दर्यापूर ते भातकुली मार्गावर कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील नवविवाहितेचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२३ (रविवार) रोजी दुपारी घडली.
निकिता कौस्तुभ जीवने (२२) असे अपघातात ठार झालेल्या नवविवाहितेचा तर कौस्तुभ उद्धव जीवने (२५, दोघेही रा. बोराळा असे गंभीर जखमीचे नाव आहे. घटनेच्यावेळी कौस्तुभ व निकिता है बुलेटने (एम.एच.२० सी.के. ७२३४) दर्यापूर येथून काही कामानिमित्त भातकुलीमार्गे अमरावतीला जात होते. दरम्यान, शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मेहर लॉनजवळ कार (एम.एच.२७ बी.ई ४४२३) शेतातून मुख्य रस्त्यावर येत होती. त्याचवेळी दुचाकी आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही पती, पत्नी गंभीर जखमी झाले.
उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने अमरावतीला पाठवले. यावेळी वाटेतच निकिता यांचा मृत्यू झाला. गंभीर कौस्तुभवर अमरावती येथील खासगी रुगणालयात उपचार सुरु आहेत. कौस्तुभ व निकिता यांचा महिनाभरापूर्वीच विवाह झाल्याचे घटना स्थळावरील नागरिकांनी सांगितले. या दुर्दैवी अपघातात नववधूचा मृत्यू झाल्याने एक संसार उद्ध्वस्त झाला आहे.