रोहतक (वृत्तसंस्था) कुटुंबातील एकुलत्या एका मुलानं आपले वडील, आई, बहीण आणि आजीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपी मुलाने आपल्या काही मित्रांच्या साथीने या सर्वांची हत्या केली. पोलीस अनेक दिवसांपासून या हत्याकांडाचा तपास करत होते. अखेर या हत्येचा उलगडा झाला असून यामधील आरोपी हा दुसरा कोणीही नसून घरातीलच व्यक्ती असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आहे.
हरियाणातील रोहतकमध्ये प्रदीप मलिक, त्यांची पत्नी, मुलगी नेहा, सासू आणि मुलगा अभिषेक राहत होते. प्रदीप मलिक यांनी या घराची वासरदार म्हणून मुलीचं म्हणजेच नेहाचं नाव लावलं होतं. ही बाब अभिषेकला मान्य नव्हती आणि घर आपल्याच नावे असावं, यासाठी तो आग्रही होता. त्याशिवाय इतर छोट्या मोठ्या कारणांवरून त्याची घरच्यांशी सतत भांडणं होत होती. एक दिवस अभिषेक घरात नसताना हल्लेखोर घरात घुसले आणि सर्वांना त्यांनी गोळ्या घातल्या. कुटुंबातील प्रत्येकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेत तिघे जागीच ठार झाले, तर नेहा गंभीर जखमी झाली. नेहाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्याचे धागेदोरे पोलिसांना मिळायला सुरुवात झाली.
अशा प्रकारे लागला आरोपीचा शोध
हत्येचे कुठलेच धागेदोरे बाहेर सापडत नसल्यामुळे पोलिसांना अभिषेकवरच संशय आला. घराची किल्ली बाहेर कशी गेली, याचा शोध घेताना पोलिसांना अभिषेकवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकने आपला गुन्हा मान्य केला. त्याच्या मित्रांनीच ही हत्या केली असून त्यांच्याकडे अभिषेकच्या घराची किल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अभिषेकला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.