मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. घराबाहेरील गाडीत धमकीचं पत्र असून यामध्ये अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे.
मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह आज मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीत आढळल्यानंतर प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली मात्र सरकारने यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचे ठामपणे सांगत या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांनी माहिती दिली. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळल्यानंतर याप्रकरणाचा मुंबई क्राइम ब्रांच तपास करत होती. मात्र, ज्या कारमध्ये स्फोटके आढळली होती त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आज मुंब्रा येथे खाडीत दलदलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन व क्राइम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे हे संपर्कात होते, असा दावा करतानाच फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रमावरच संशय घेतला व या प्रकरणाचे गांभीर्य पाहता तपास एनआयए कडे देण्यात यावा, अशी मागणी केली. दरम्यान, या प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी तातडीने विधानभवन गाठत गृहमंत्री अनिल देशमुख यांना तपशील सादर केला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमचे पोलीस सक्षम आहेत. एनआयएकडे हा तपास देण्याची गरज वाटत नाही, असे गृहमंत्र्यांनी नमूद केले.
देशमुख यांनी नंतर सभागृहाबाहेर येऊन माध्यमांशी थोडक्यात संवाद साधला. यावेळी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटके आणि स्कॉर्पिओ कारच्या मालकाचा झालेला संशयास्पद मृत्यू या सगळ्याचा तपास एटीएसकडे सोपवण्याचा निर्णय झाला आहे, असे देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी भारतातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. परंतु, ही गाडी तिथे कोणी ठेवली यासंदर्भात अद्याप कळू शकलेलं नाही. अशातच पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. स्फोटकं ठेवण्यात आलेली गाडी ही चोरीची असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मूळ मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख हिरेन असं त्यांचं नाव आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.