कोल्हापूर (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा या तक्रारदार महिलेने मागे घेतली आहे. या घटनेमुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर तात्काळ प्रतिक्रिया दिली आहे. “आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. ‘धनंजय मुंडे यांच्या बाबतीत आम्ही घेतलेला निर्णय योग्यच होता हे आता समोर आलेय’ असे शरद पवार म्हणाले आहेत.
रेणू शर्मा प्रकरणामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली असताना दिलासादायक बातमी समोर आली. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. या सगळ्यात किंगमेकर असणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. शरद पवार म्हणाले की, ‘रेणू शर्मानी केस परत घेतली असल्याचं समजलं. आम्हाला प्रथमदर्शनी सातत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असं मी आधीच म्हटलो होतो. आमचा निर्णय बरोबर होता असं आता वाटतंय. त्यामुळे आता जे झालं त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच मुंडे यांच्यावरील विश्वास खरा ठरला असंच यावरून म्हणावं लागेल.
दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं, “या प्रकरणी पहिल्यापासूनच भाजपची याबाबतची भूमिका स्पष्ट होती. एक चुकीचं उदाहरण आम्ही महाराष्ट्रात सेट होऊ देणार नाही, ही भूमिका आम्ही घेतली होती आणि त्यातून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला होता. “पण, संबंधित महिलेनं बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे तिच्यावर आयपीसीअंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. मुंबई पोलिसांनी खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर तत्काळ कारवाई करावी.”