मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेल्या बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण आता महाराष्ट्रात आढळले आहेत. या प्रकारांचे एकूण सात रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर शून्य मृत्यूची (corona deaths) नोंद झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, राज्य सरकारनंही चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क घालण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जालन्यात बोलताना, मास्क सक्तीबाबत विचार करण्याबाबत सूचक विधान केले होते. त्याचवेळी राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शनिवारी गेल्या २४ तासांतील कोरोना अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच कालावधीत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात पहिल्यांदाच B.A.4 आणि B.A.5 व्हेरियंटचे ७ रुग्ण
राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यात ओमिक्रॉनच्या B.A.4 आणि B.A.5 व्हेरियंटचे ७ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या समन्वयाने जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून, पुण्यातील ७ रुग्णांना या नव्या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. ४ रुग्णांना B.A.4 व्हेरियंटचा, तर ३ रुग्णांना B.A.5 व्हेरियंटचा संसर्ग झाला आहे. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील असून, ४ ते १८ मे या कालावधीतील आहेत. या ७ रुग्णांमध्ये ४ पुरूष आणि ३ महिला आहेत. ४ जण हे ५० वर्षांवरील आहेत. तर दोन हे २० ते ४० वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण १० वर्षांखालील आहे.