नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कमी येताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत १ लाख ७३ हजार नव्या रुग्णांची भर पडली असून २ लाख ८४ हजार ६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ३६१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काही दिलासादायक वातावरण आहे. भारतातील कोरोनाव्हायरसच्या दुसर्या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. सलग दुसर्या दिवशी देशात दोन लाखांहूनही कमी कोरोना रुग्ण आढळले. गेल्या २४ तासात एकूण १.७३ लाख नवीन कोरोना रुग्ण आढळले. गेल्या ४५ दिवसातील सर्वात कमी संख्या आहे. या कालावधीत ३६१७ लोकांनी कोरोनामुळे आपला जीवही गमावला आहे. डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या सलग १६ व्या दिवशी बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. गेल्या एका दिवसातच २.४८ लाख रुग्ण बरे झाले आहेत. यासह, भारतात सध्या रिकवरी रेट ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात सध्या कोरोनाची एकूण २२,२८,७२४ सक्रिय प्रकरणे आहेत.
१२ एप्रिल नंतर आज (शुक्रवार) नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यूंची संख्या सध्याही चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्रात १०,०२२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये ४८६ लोकांचा मृत्यू झाला. तसेच तामिळनाडूत ३१,००० नवीन करोना रुग्ण आढळले. तर कर्नाटकमध्ये २३,००० कोरोनाबाधित आढळले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र लशींचा तुटवडा असल्यामुळे देशात अनेक राज्यातील लसीकरण केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आतापर्यंत देशात २२,२८,७२४ लोकांचे लसीकरण झाले आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात शुक्रवारी २०,७४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ३१ हजार ६७१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९३.२४ टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान आज ४२४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख आज आणखी खाली आला आहे. रिकव्हरी रेट वाढल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,०७,८७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
















