नवी दिली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे. सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख ५७ हजार २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार १९४ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. तसेच सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ३० लाखांच्या खाली आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ५७ हजार २९९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना दिसत नाही. गेल्या २४ तासांत देशात ४ हजार १९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या दोन लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात काल (२१ मे) दिवसभरात २९ हजार ६४४ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर ४४ हजार ४९३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५०,७०,८०१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.