नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणातील लोक देशभक्त असून काँग्रेस पक्ष फूट पाडणारा आहे. तसेच संपूर्ण जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार, जातिवाद व घराणेशाहीची हमी देतो, असा हल्लाबोल मोदींनी केला.
हरयाणात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवरून म्हणाले की, काँग्रेस हरयाणाला कधीच स्थिर सरकार व देशाला बळकटी देऊ शकत नाही. गत १० वर्षांत भाजपने हरयाणातील लोकांचे जीवन समृद्ध केले. आम्ही सर्वच घटकांना न्याय दिला. शेतकरी, युवक, महिला, गाव आणि शहरांचा विकास करण्यात आम्ही कसर सोडली नाही. हरयाणाला घोटाळे व दंगलखोरांच्या काळातून बाहेर काढले. यंदाच्या निवडणुकीत मतदारांचा उत्साह पाहता जनता नक्कीच भाजपला आशीर्वाद देणार आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
हरयाणातील देशभक्त लोक काँग्रेसच्या फूट पाडणाऱ्या व नकारात्मक राजकारणाला कधीही स्वीकारणार नाहीत. आजघडीला जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अशा स्थितीत हरयाणातील लोक भारताला बळकटी देणाऱ्या पक्षाला निवडून देतील, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. काँग्रेसच्या नेत्यांनी आरक्षण संपवण्याचे वक्तव्य करून स्वतःचे इरादे जाहीर केले आहेत. म्हणूनच हरयाणातील मागासवर्गीय व दलित समुदाय काँग्रेसवर नाराज असल्याचे मोदी म्हणाले.