मुंबई (वृत्तसंस्था) सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्याशी संबंधित साठा आणि दागिन्यांच्या साठ्यात हालचाल झाली आहे. येत्या काळात सोन्याच्या दरात काही हजारांनी (Gold Rate) घट होण्याची शक्यता आहे. वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
सध्या सोन्यावर ७.५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. तर २.५ टक्के इतका कृषी सेस लावला जातो. त्यानुसार एकूण आयात शुल्क १० टक्के आहे. मार्च २०२२ पर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. सोन्याचे आयात शुल्क कमी करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. भारत हा सोन्याची आयात करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे. यावर्षी ९०० टन सोन्याची आयात करण्यात आली आहे. जी मागील ६ वर्षांतील सर्वाधिक आयात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यंदाच्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क १२ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर आणले आणि त्याचे उद्योग जगताने स्वागत केले.
सरकारने वाणिज्य मंत्रालयाच्या शिफारशी मान्य केल्या तर सोन्याची तस्करी कमी होण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, भारतात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात सोन्याची आवक होत आहे. त्यामुळे सरकारला आयात शुल्काचा तोटा सहन करावा लागतो आहे. या वर्षी ९०० टन सोने आयात करण्यात आले. मात्र एका अहवालानुसार एकूण आयात करण्यात आलेल्या सोन्यापैकी २५ टक्के सोने हे अवैध मार्गाने देशात करण्यात आली आहे. त्यापैकी २०० ते २५० टन सोने हे तस्करीच्या मार्गातून येत असल्याची माहितीही या अहवालात देण्यात आली आहे.