जळगाव (प्रतिनिधी) गोलाणी मार्केटमधील बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचे पाणी तसेच पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून याचा त्रास दुकानदारांनासह ग्राहकांना होत आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दुकानदार आणि शिवसेनेच्यावतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले.
गोलाणी मार्केटच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रेनेजचे पाणी तसेच पावसाचे पाणी साचत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते. याचा त्रास दुकानदारांना होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. वारंवार तक्रारी करूनही समस्या सोडवली जात नसल्याने दुकानदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी एकत्रित येत साचलेल्या पाण्यात मासे सोडण्यात सोडले, तसेच पालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या नावाने कागदाच्या बोटी तयार करून पाण्यात सोडण्यात आल्या. अनेक तक्रारी करूनही ही समस्या कायम असून अधिकारी, पदाधिकारी पाहणी करायला येऊन जातात. मात्र समस्या सोडवली जात नसल्याची खंत मंगला बारी यांनी व्यक्त केली. तर सत्ताधारी भाजपला नागरिकांनी मोठ्या मतांनी विजयी करून दिले, मात्र त्यांनी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याची टीका पालिकेचे विरोधी पक्षनेता सुनिल महाजन यांनी केली. यावेळी आंदोलनात शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेता डाॅक्टर सुनील महाजन, विष्णू भंगाळे, मंगला बारी, खूपचंद साहित्या, प्रशांत सुरळकर, पुनम राजपूत आदींसह मार्केटमधील दुकानदार उपस्थित होते.