अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरासह तालुक्यातील सध्याची रुग्णसंख्या पाहता तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता लक्षात घेता, शासनाच्या नवीन नियमावलीनुसार ब्रेक द चैन अंतर्गत सूट मिळणार आहे. यात शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे यामुळे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
शासनाने ‘ब्रेक द चेन’ च्या नवीन आदेशात १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत काही प्रमाणात शिथिलता प्रदान केलेली आहे. यात सर्वत्र एकसारखे नियम लागू न करता नगरपरिषद क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर तसेच उपलब्ध ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर नियम अवलंबून असतील.
या नियमांचा विचार करता २९ मे २०२१ च्या आकडेवारीनुसार शहरासह तालुक्याचा सरासरी पॉझिटिव्हीटी दर ७.२५ असून मागील दोन दिवसात हाच दर शून्य ते २ पर्यंत खाली आला असून, शासकीय ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध आहेत. तालुक्यात ६० शासकीय ऑक्सिजन बेड असून आज घडीला फक्त ८ ते १० रुग्ण उपचार घेत आहेत. म्हणजेच कोविड पॉझिटिव्हीटी दर १०% पेक्षा कमी असून उपलब्ध ऑक्सिजन बेड देखील ४०% पेक्षा कमी भरले असल्यामुळे १२ मे २०२१ च्या नियमांआधारे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. संपूर्ण प्रशासनाच्या, डॉक्टरांच्या अहोरात्र मेहनतीमुळे तालुक्याचा पॉझिटिव्हीटी दर कमी होण्यास मदत झालेली आहे.
निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा
या नियमांच्या आधारे आवश्यक असलेल्या दुकानांसोबतच आवश्यक नसलेल्या इतर सेवांच्या दुकानांना देखील सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग या सर्वानाच याचा फायदा होईल तसेच जळगाव जिल्हा हा कृषिप्रधान असल्यामुळे मान्सूनपूर्व शेती विषयक कामे तसेच पेरणी हंगाम सुरू असल्याने कृषी संबंधित सेवा पुरवणारी दुकाने हे दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ या अतिरिक्त वेळेत सुरू असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांन मॉन्सूनपूर्व कामे करण्यास हातभार लागेल. निर्बंध शिथिल झाले असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.